पुण्यात ‘विधी साक्षरता कार्यशाळा’ उत्साहात संपन्न



पुणे : जमीन-जुमला व मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये महसुली कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांमध्ये विधी साक्षरता वाढविण्याच्या उद्देशाने शिव सह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा बालेवाडी येथील युथबिल्ड फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडली.
या कार्यशाळेत जमीन व मालमत्ता खरेदी-विक्रीसंदर्भातील कायदे, ७/१२ उतारा, ८-अ आणि फेरफार यांची सविस्तर माहिती तसेच ती कागदपत्रे कशी वाचावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय वारस नोंद, वाटणी पत्रक, हक्कसोड पत्रक प्रक्रिया तसेच महसुली न्यायालयातील कामकाज याविषयीही उपस्थितांना माहिती देण्यात आली. सातबारा, फेरफार आणि बिनशेती (NA) प्रक्रियेबाबतही सखोल चर्चा झाली.
कार्यशाळेस मार्गदर्शन करताना निवृत्त सनदी अधिकारी तथा माजी कृषी आयुक्त शेखर गायकवाड आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी महसुली कागदपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले व नागरिकांनी व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
यावेळी शिव सह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी समाजात विधी साक्षरतेची वाढती गरज स्पष्ट केली. कार्यक्रमास शिव सह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव विक्रम सिंह लावंड,खजिनदार नितीन साळुंखे, भुमाता संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक सुनील हरपुडे यांनी आभार प्रदर्शन केले.
