OBC इतर मागास प्रवर्ग कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी-मराठा , मराठा जात प्रमाणपत्र
महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) यात सन २०१८ मध्ये खालील पुराव्यांचा समावेश केलेला आहे .
१) वडील, काका, आत्या किंवा आजोबा किंवा आजोबांचे भाऊ किंवा बहीण किंवा पणजोबा किंवा पणजोबाचे भाऊ किंवा बहीण, वडिलांकडील रक्ताचे नातेवाईक यांचा शाळा नोंदवहीतील उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म आणि मृत्यु नोंदवही किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कागदपत्रांतील जातीच्या नोंदींचा उतारा
२) वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांचा जन्म आणि मृत्यु नोंदवहीतील उतारा (गावाची नोंदवही नमुना क्रमांक-१४), स्थानिक स्वराज्य संस्थांची कागदपत्रे ;
३) संबंधित जातप्रवर्गाच्या मानीव दिनांकापूर्वी नोंदविण्यात आलेली वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या कागदपत्रात नमूद करण्यात आलेली जातीची नोंद, उदा. जमीन, घर किंवा इतर स्थावर संपदेच्या विक्री किंवा खरेदी विलेख, गहाणखत, करारनामा, इनाम सनद ज्याद्वारे हक्क हस्तांतरित केले गेले असतील
४) मुख्यतः औरंगाबाद महसुली विभागाकडील राष्ट्रीय नोंदवही यातील वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या जातीची नोंद
५) विदर्भातील जमिनीच्या संदर्भातील कागदपत्रातील खासकरून कोतवाल किंवा कोतवार पुस्तकातील वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या जातीची नोंद, खस-याचा उतारा, इत्यादी किंवा वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या जन्म आणि मृत्यु दाखल्यातील जातीची नोंद
६) पुराभिलेख संचालनालयातील अभिलेखात उपलब्ध असलेले जातीचा पुरावा देणारे इनाम जमिनिशी संबंधित कागदपत्रे उदा. लेखी विवरणपत्र, मौखिक पुरावा, पुर्शिस, वंशावळ, इत्यादी ;
७) गाव फेरफार नोंदवहीतील जातीच्या नोंदीचा क, ड, ई पत्राच्या नमुन्यातील कागदपत्रे, जुन्या न्याय प्रक्रियांमधील कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या रक्ताच्या नातेवाईकांच्या जातीच्या नोंदी
८) वडिलांकडील रक्ताच्या सख्ख्या नातेसंबंधात पूर्वजांच्या संदर्भात मानीव दिनांकापूर्वी जुन्या जाती व्यवस्थेतील परंपरागत व्यवसायाची नोंद करण्यात आलेले शासकीय आणि निमशासकीय प्रमाणपत्र ;
९) आडनावाऐवजी परंपरागत व्यवसायाचा जात म्हणून नोंद असलेला जुना अभिलेख
१०) मानीव दिनांकापूर्वीची सनद किंवा कामकाज, ज्यात महाराष्ट्र कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ (चा ६७) किंवा इतर कोणत्याही कायद्यातील तरतुदींनुसार कुळास जमिनीचा मालक म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि जातीची नोंद करण्यात आली आहे
११) मानीव दिनांकापूर्वी जनगणनेच्या अभिलेखात घेण्यात आलेल्या जातीच्या नोंदी.
आता २७ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचनेनुसार या यादीमध्ये खालील कागदपत्रांची वाढ करण्यात आलेली आहे.
१२) महसुली अभिलेख नोंदी – खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कूळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नं. ०१ हक्क नोंदपत्रक, नमुना नं. ०२ हक्क नोंदपत्रक व ७/१२ उतारा.
१३) जन्म-मृत्यु रजिस्टर संबंधिचे अभिलेख – गाव नमुना नं. १४
१४) शैक्षणिक अभिलेखे – प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर
१५) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेखे – अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख
१६) कारागृह विभागाचे अभिलेखे – रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रीझनर, कच्चा कैद्यांची नोंदवही
१७) पोलीस विभागाकडील अभिलेखे – गाववारी, गोपनीय रजिस्टर सी-१, सी-२, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे व एफ.आर.आय. (F.I.R.) रजिस्टर
१८) सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेखे – खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोकेपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधानपत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोडपत्रक, इतर दस्त
१९) भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेखे – पक्काबुक, शेतवारपत्रक, वसुली बाकी, ऊल्ला प्रतीबुक, रिव्हीजन प्रतीबुक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणीपत्रक, नमुना नं. ३३ (प्रतीकडील इसमवार यादी), नमुना नं. ३४ (खानेसुमारी तक्ता) व टिपण बुक
२०) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडील अभिलेखे – माजी सैनिकांच्या नोंदी
२१) जिल्हा वक्फ अधिकारी यांचे कार्यालयाकडील अभिलेखे – मुंतखब
२२) शासकीय कर्मचा-यांचा सेवा तपशीलाबाबतची अभिलेखे – मानीव दिनांकपुर्वीचे कर्मचा-यांचा सेवा तपशील
२३) जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेखे – वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे.
कुणबी,कुणबी-मराठा,मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रक्रिया त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे ( कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्याना EWS किंवा स्वतंत्र मराठा आरक्षण अस्तित्वात आल्यास त्यात जाता येणार नाही याची नोंद घ्यावी )
१) अर्जदाराने वंशावळ तयार करणे – अर्जदाराचे नाव पासून वडिल, चुलते, आत्या, आजोबा, चुलत आजोबा, वडिलांची आत्या, पणजोबा, चुलत पणजोबा, आजोबाची आत्या, खापर पणजोबा, चुलत खापर पणजोबा, आजोबाची आत्या, खापर खापर पणजोबा, चुलत खापर खापर पणजोबा, संबंधित नात्यातल्या पत्नीही चालतील. वरील नोंदी कुणबी जात उल्लेख असलेलेच दाखले ग्राह्य धरले जातात.
२) तहसील कार्यालयात अर्ज करून वरील नावे यांचे जन्म मृत्यूची नोंद असलेले दाखले मागणी करणे.
३) तहसील कार्यालयातून वरील नावाचे फेरफार, वारस फेरफार, ७/१२ उतारे (आवश्यकता लागल्यास) कढई पत्र, सूड पत्र)
४) रुपये १०० च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करणे.
५) सन १९२० पर्यंत मोडी लिपी काही ठिकाणी उर्दू असल्या कारणाने उर्दू , मोडी भाषांतरकाराचे प्रतिज्ञापत्र तयार करणे.
६)भाषांतर करणा-याचे प्रमाणपत्र
वरील कागदपत्रांचे टायपिंग करून ते नोटराईज्ड करणे.
१) अर्जदाराचा फोटो २) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला – मूळ प्रत ३) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला – मूळ प्रत ४) रहिवासी दाखला – मूळ प्रत ५) वीज बिल चालू महिन्यातील – छायांकित प्रत ६) रेशन कार्ड – छायांकित प्रत ७) आधार कार्ड – छायांकित प्रत ८) पॅन कार्ड – छायांकित प्रत ९) मतदान ओळखपत्र – छायांकित प्रत १०) विवाहित स्त्रीयांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास विवाहापूर्वी जात सिद्ध करणारा किंवा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा पुरावा म्हणून विवाहनोंदणी दाखला किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेला नाव बदलाबाबतचा पुरावा सादर करावा.
वरील सर्व कागदपत्रांची फाईल तयार करुन तहसिल कार्यालयात जमा करणे.
अ) सदर फाईल सोबत तहसील कार्यालयाचा गृह चौकशी अहवाल घेणे.
ब) मंडल अधिकारी चौकशी अहवाल घेणे,
क) वरील सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मे. प्रांत यांचेकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मागणीसाठी फाईल सादर करणे.
यातील ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) यामधून आर्थिक सवलती घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
(टीप: नोटरी झालेली फाईलच्या २ छायांकित प्रती काढणे. अ) १ प्रत घरी ठेवणे ब) १ प्रत साक्षांकित करणे)
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज करावा.
